मतपत्रिका व्हायरल केल्याप्रकरणी सेवेतून निलंबन

बीड दि.17: आष्टी विधानसभा मतदारसंघामधील टपाली मतपत्रिका क्रमांक 101186 सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईच्या सशस्त्र पोलिस ताडदेव येथील पोलिस गणेश अशोक शिंदे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.आष्टी विधानसभा मतदारसंघामधील टपाली मतपत्रिका क्रमांक 101186 सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे व तशा तक्रारी इतर उमेदवारांनी केल्या आहेत.

ही टपाली मतपत्रिका 185-मलबार हिल विधानसभा मतदारसंघ, मुंबई येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार (नमुना-12) मुंबईच्या ताडदेव पोलिस ठाण्यातील पो.कॉ. गणेश अशोक शिंदे यांना निर्गमित करण्यात आली होती.विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड,गिरगाव चौपाटी, चर्नी रोड, मुंबई येथील सुविधा केंद्रातील केंद्र क्रमांक 3 वरून त्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मत नोंदविल्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून तो सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 सह लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 128 अन्वये बृहन्मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्यात शुक्रवार (ता.15) रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. सदरील घटनास्थळ मलबार, मुंबई येथील असल्यामुळे गुन्हा तेथे नोंदविण्यात आलेला आहे.